अक्षरनंदन शाळेची सुरवात १९९२ मध्ये झाली. शासकीय अभ्यासक्रम व मान्यता ह्यांची चौकट अक्षरनंदनने स्वीकारली आहे. अभ्यासक्रम शिकविण्यासाठी पाठयपुस्तक हे एक महत्वाचे संसाधन आहे. पण मुलांचे शिकणे कोणत्याच टप्प्यावर 'पुस्तकबंद' न राहता, लेखी प्रशोन्तरांच्या पलीकडे जावे यासाठी विविध शैक्षणिक अनुभवातून मुलांना जोखले जाते.  स्वभाषेच्या माध्यमातून आणि आजूबाजूच्या पर्यावरणातून मूल शिकते तेव्हा शिकणे सहजपणे घडते. शिकलेले व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनते. म्हणूनच अक्षरनंदनचे  माध्यम मराठी आहे.

भारताची राजभाषा हिंदी आणि जगाची खिडकी असलेली इंग्रजी या भाषांची ओळख, गाणी 
गोष्टी चित्रांद्वारा बाल गटापासून होते. मराठीच्या भक्कम पायावर ह्या दोन्ही भाषांचे औपचारिक शिक्षण सुरु होते.

उपक्रमांचे स्वरूप केवळ सहशालेय नसते. अभ्यास विषयांशी त्याचा थेट संबंध असतो. भेटी, सहली, शिबिरे मुलांना बाहेर घेऊन जातात तर शाळेत येणारे बहुढंगी पाहुणे, मुलाखतींवर आधारित भूगोल प्रकल्प बाहेरचे जग शाळेत आणतात.

Dukan Jatra   दुकानजत्रा हा एक असाच उपक्रम. शाळेत लुटूपुटीच्या बँकेतून खरे कर्ज घेणे, ठोक भावाने वस्तू खरेदी करणे, त्यासाठी विक्रेत्यांशी बोलणे, कार्यानुभवाच्या तासाला सुबक वस्तू बनविणे, त्यांच्या विक्रीसाठी जाहिराती तयार करणे व नंतर नफ्या तोटयाचे हिशेब मांडणे, अशा कृतींमधून भाषा, गणित, कला जिवंत होतात.

 अक्षरनंदन मध्ये परीक्षा असते पण गुणानुक्रम काढून हुशार-ढ असे शिक्के मारण्यासाठी नाही. बालवाडीत मूल आल्यापासून त्याच्या आवडीनिवडी, क्षमताशिकण्यातला रस व गती, याची तपशीलवार निरीक्षणे शिक्षक नोंदवितात. लहान मुलांच्या बाबतीत वेळेची मर्यादा काटेकोर नसते. परीक्षेत झालेली चूक स्वतःच सुधारण्याची संधीहि दिली जाते. पाचवी नंतर मुलांची श्रेणीशी ओळख होते. आठवी पासून पुढे गुण दिले जातात.

खरेतर परीक्षा केवळ मुलांची नसते. शिक्षक व पालक मुलांपर्यंत पोहोचण्यातकुठे पुरे पडल,े कुठे कमी पडले, शिकविण्याच्या रीतींमध्ये कुठे कोणते बदल करायला हवेत, याचीही चाचपणी मूल्यमापनाच्या प्रक्रियेतून होते.

 योग्य टप्प्यावर शालांत परीक्षेचा ढाचा व तंत्रे समजून घेतली , आवश्यक तो सराव केला तर मुले शालांत परीक्षा समाधानकारकरीत्या देतील, त्याचबरोबर सर्जक, संवेदनशील व आत्मनिर्भर जीवन जगण्यास  लागण्या–या  आत्मविश्वासाची तिजोरी मुलांना मिळेल अशा विश्वासातून अक्षरनंदन काम करत आहे .

 यांचा वाटा मोलाचा

शाळेची भूमिका समजावून घेत, कृतीप्रधान अध्ययन पद्धती स्वतः आत्मसात करत, शैक्षणिक अनुभव मुलांपर्यंत पोहोचविणारे उत्साही शिक्षक हे अक्षरनंदन मधील कळीचा घटक आहेत.

तसेच, काहीशा निराळ्या वाटेने जाण्या-या शाळेत आपल्या मुलांना पाठविणा-या आणि शाळेच्या उभारणीत क्रियाशील सहभाग देणा-या पालकांचे योगदानही महत्वाचे आहे.