अशा भूमिकेतून

अक्षरनंदन मधील वातावरण सर्वसमावेशक असावे, स्पर्धात्मकतेला खतपाणी घालणारे नसावे, म्हणून विभिन्न सामाजिक- आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांना शाळेत आवर्जून प्रवेश दिला जातो. काही शाररीक व मानसिक कमतरता असलेल्या मुलांनाही सामावून घेतले जाते. सर्वांच्या एकत्रित शिकण्यातून परस्परांचा स्वीकार वाढीस लागेल असा विश्वास त्यामागे आहे.

 गुणवत्तेची कदर अक्षरनंदन जरूरच करते. मात्र विविध परीक्षांना वा स्पर्धांना निवडक मुलांना लहानपणापासून उतरवून, ढाली पदके मिळवून शाळेचे नाव करण्यासाठी नाही. आपल्यातील विशेष गुणांकडे विश्वस्त वृत्तीने बघून इतरांनाही त्याचा लाभ मिळावा, तसेच कला - क्रीडा व अन्य शैक्षणिक अनुभवांत सहभागी होण्याची  संधी प्रत्येकाला मिळावी यावरही शाळेचा भर आहे.

 झाडे लावा   व वन्यजीव वाचवा अशा कृतींपलीकडे जाणारी , निसर्गातील परस्परपोषक परिचक्रांचा अभ्यास करून आपल्या एकुलत्या एक पृथ्वीचा चिरंजीवी विकास साधणारी पर्यावरणीय दृष्टी रुजावी ह्यासाठी अक्षरनंदन प्रयत्नशील आहे.

 बाहेरून लादलेल्या आणि भीतीपोटी स्वीकारलेल्या शिस्तीचा बडगा शाळेमध्ये नसावा . मुलांचा चौकसपणा वाढीस लागेल , निर्भिडतेने  प्रश्न विचारून , स्वतंत्र अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळेल असे मोकळे वातावरण असावे. मात्र स्वातंत्र्याचा अर्थ मला हवे तसे करता येणे असा नाही. दुस-याची कदर करणारी, उत्स्फूर्ततेने तरीही जबाबदारीने वागण्यास प्रवृत्त करणारी स्वयंशिस्त, मुलांच्या व मोठ्यांच्याही अंगी बाणावी अशी अक्षरनंदनची भूमिका आहे

जात,धर्म व वंश याआधारे भेदाभेद उत्पन्न करण्याया तसेच स्त्री पुरुष असमानता रुजविण्या-या  विघातक संस्कारांनी मुलांचे मन कलुषित होऊ नये याविषयी अक्षरनंदन जागरूक आहे.

समग्र व्यक्तिमत्व घडण्यासाठी बुद्धीच्या जोडीला हातही कुशल असायला हवेत; भावनिक संतुलनही हवे. याकरता शेती, हस्तकला, शिवण यासारख्या समन्वय साधणा-या कृती मुलांनी मनापासून करण्याला अक्षरनंदन मध्ये विशेष स्थान आहे